ठाणे -पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्यावतीने भिवंडी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी पारितोषिके दिली जातात. मात्र, यंदाचा पारितोषिक सोहळा शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गाजला.
भिवंडी शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांनी भाषणात खड्ड्यांमुळे माझ्या मुलाला गेल्या तीन वर्षांपासून कोणीही मुलगी द्यायला तयार नसल्याचे सांगत पालिका प्रशासनावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यावर भोई यांना ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर प्रत्युत्तर देताना म्हणाले की, आपल्या देशाची परंपरा श्री प्रभू रामचंद्र जंगलात गेले. त्यांच्यासोबत तक्रार न करताच सीता ही जंगलात गेली, मग निव्वळ खड्ड्यामुळे यायला काहीच हरकत नाही. असा मार्मिक टोला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांना लगावला. त्यांनतर भिवंडी महापालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनाही मदन भोई यांनी व्यक्त केलेली खड्ड्यावरून खंत चांगलीच झोंबली. त्यांनीही गणपती पूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जाणार असल्याचे पुन्हा आश्वासन देऊन रस्ते झाल्यावर मदन भोई यांच्या मुलाला 1 नाही तर 100 मुलींचे मागणी येतील, असा टोमणा मारला. यावेळी व्यासपीठावर खासदार आणि दोन आमदार हे उपस्थित होते. तर या खड्ड्यांच्या 'रामायणा' मुळे पारितोषिक वितरण सोहळ्याला आलेल्या कार्यकर्त्यांची चांगलीच करमणूक झाली.