नवी मुंबई- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 4 मेपासून संपूर्ण कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, असा मेसेज समाज माध्यमावर लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वायरल करण्यात आला होता. मात्र, पनवेल महानगरपालिकेने असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली आहे. महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही माहिती दिली.
'पनवेल 4 मेपासून बंदचा तो व्हायरल मेसेज खोटा, असा कोणाताही निर्णय नाही' - कोरोना विषाणू
पनवेलमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता बहुतांश आपत्कालीन सेवेतील या व्यक्ती आहेत. त्यांना पनवेल ते मुंबई ये-जा करण्यामध्ये संसर्ग किंवा संक्रमण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पनवेलमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता बहुतांश आपत्कालीन सेवेतील या व्यक्ती आहेत. त्यांना पनवेल ते मुंबई ये-जा करण्यामध्ये संसर्ग किंवा संक्रमण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पनवेलमधील लोकप्रतिनिधींनीच्या माध्यमातून 3 मे नंतर पनवेल बंद करू, असा मेसेज वायरल झाला होता. त्या अनुषंगाने आज पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्टीकरण देत असा कोणताही आदेश महापालिका किंवा सरकारने काढला नसून लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच या वाढलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करून आपत्कालीन गोष्टी शिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन केले.
अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना जसे की, मेडिकल, रुग्णालय, डेअरी, किराणा दुकाने, भाजी मंडई इत्यादी पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच वाढवलेल्या लॉकडाऊनचे पूर्वीप्रमाणेच पालन करावे. सर्वच दुकाने बंद करून नागरिकांची गैरसोय करू नये. कोणालाही वेठीस धरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नये. ग्राहकांना आवश्यक तिथे घरपोच सेवा द्यावी. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, घरात राहणे अत्यावश्यक आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.