ठाणे -हिवाळ्याच्या दिवसात फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे फळांची आवक घटल्याने त्यांच्या दरात १० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे अनेकांनी फळ खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे फळांच्या मागणीत घट झाल्याचे फळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
फळांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण उत्तम आरोग्यासाठी दररोजच्या आहारामध्ये फळांचेही सेवन करतात. त्यामुळे या काळात फळांना जास्त मागणी असते. दरवर्षी या काळात फळांचे दरही स्थिर असतात. मात्र, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यासह, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ठाण्यासह अनेक उपनगरांतील बाजारपेठांमध्ये होणारी फळांची आवक घटली आहे. त्यामुळे फळांच्या दरांमध्येही १० ते ४० रुपयांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
डाळिंबाचे दर भडकले -
ठाण्यात व उपनगरांतील बाजारपेठेत नाशिकहून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होते. या काळात डाळिंबाला मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे या पिकाचेही नुकसान झाले असून त्यांची आवक घटली आहे. आवक घटल्याने डांळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पूर्वी १८० रुपये किलोने मिळणारे डाळिंब सद्य:स्थितीला २२० रुपये किलोने विकले जात आहे. सीताफळ, मोसंबी आणि सफरचंद यांच्या दरातही वाढ झाली असून त्यांची मागणी घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
फळे गरजेची गोष्ट -
वेगवेगळ्या फळांमध्ये विविध जीवनसत्वे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लहान मुलांसाठीही फळे अत्यावश्यक गोष्ट असते. शारीरिक वाढ होताना फळांमध्ये मिळणारे विटॅमिन्स आणि मिनिरल्स फायद्याचे असतात. त्यामुळे पालक मुलांना आवर्जून फळे खाऊ घालतात. मात्र, आता फळे महाग झाल्यामुळे या सर्वांवरती परिणाम होणार आहे.