ठाणे : राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. भिवंडी, कल्याण शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसवर गेला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच शहरासह ग्रामीण भागातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडी वाजत आहे. या थंडीचा परिणामामुळे दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे.
ठाण्यात तापमान घसरले : जिल्ह्यात सर्वात कमी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कल्याणात झाली. त्यापाठोपाठ भिवंडी व ग्रामीण भागासह डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यातही पारा घसरलेला दिसून आला. त्यामुळे थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. सकाळी आणि रात्री चांगली थंडी जाणवत आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरल्याची नोंद झाली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून मोसमातील सर्वाधिक आज थंड दिवस ठरला. जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने जवळपास सर्वच शहरात गारठा अनुभवास मिळाला. उत्तरेतून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात तापमानात घट होत असल्याचे सांगितले आहे.