ठाणे - घराचे दार उशिरा उघडल्याच्या रागातून मित्राचा हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर प्रहार करून खून करणाऱ्या आरोपी मित्राला पोलिसांनी १० दिवसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना उल्हासनगर कॅम्प नं.१ येथील संत रोहीदास नगर येथील एका कारखान्याच्या आवारात असलेल्या खोलीत घडली.
धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला मित्र दारूच्या नशेत घरात पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपीने केल्याने पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र,पोलिसांनी साक्षीदारांचे जवाब, सीसीटीव्ही फुटेज व पोस्टमार्टमच्या अहवालावरून तो अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे घडकीस आल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामजीत विश्वकर्मा (४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दिनेशकुमार चिंकुप्रसाद गुप्ता (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.१ येथील संत रोहीदास नगर सी ब्लॉक रोड येथील सरताज खान या कारखाना मालकाच्या खोलीत मृत दिनेशकुमार आणि आरोपी रामजीत राहत होते. १० दिवसापूर्वी मृत दिनेशकुमार व आरोपी रामजीतमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला होता. त्याच दिवशी रात्री मृत दिनेशकुमार हा खोलीवर जाऊन त्याने दार बंद करून झोपला होता. त्यानंतर आरोपी रामजीत हा खोलीवर आल्यानंतर त्याने मृत दिनेशकुमारला दार उघडण्यासाठी सांगितले. मात्र, त्याने दार उशिरा उघडल्याने या दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन एका हत्याराने दिनेशकुमार याच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण करून त्याला जागीच ठार मारले. तो दारुच्या नशेत खाली जमिनीवर पडल्याने त्याच्या नाकातून रक्त येवून दुखापत होवून अतिरक्तास्त्रव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी माहिती त्याचा भाऊ आशिषकुमार याच्याकडून उल्हासनगर पोलिसांना मिळाल्याने या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. मात्र, दिनेशकुमार याच्या मृत्यूबाबत त्याच्या नातेवाईकांना व पोलिसांनाही संशय होता. त्यामुळे दिनेशकुमार याच्या मृत्युचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हाससनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात पाठवला.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बांबळे करत होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व पोलीस निरीक्षक(गुन्हे) आर.एस.बयस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दिनेशकुमार गुप्ता याच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी व गुप्त माहिती काढली. त्यानुसार दिनेशकुमार याच्यासोबत त्याचा सहकारी मित्र रामजीत विश्वकर्मा हा राहत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी दिनेशकुमार दारूच्या नशेत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना आरोपी रामजीत याने दिली होती. त्यामुळे आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही असे त्याला वाटले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज व वैद्यकीय अहवालावरून तो खुनाचा प्रकार उघडकीस आणण्यास उल्हासनगर पोलिसांना यश आले आहे.