ठाणे : Fraud With Cloth Merchant : या फसवणूक प्रकरणी १२ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ कुमार अग्रवाल, जॉन टेलर डे, मयांक तिवारी, सुप्रिया मुन्शी, मुकेश शर्मा, ऋची त्रिपाठी, ऋषिकांत पासवान, विक्रांत कुमार, दास राजदीप सुप्रम, सजीत नारायणण, अंकुश मिश्रा, गगणदीप सैनी अशी गुन्हा दाखल झालेल्या १२ भामट्यांची नावे आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
भामट्यांची संगनमत आणि फसवणूक:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील माजीवडा भागात कपडा व्यापारी श्रीराम किसनस्वरूप गोयल हे राहतात. त्यांचा भिवंडी तालुक्यातील कशेळी गावाच्या हद्दीत राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये 'टॉपमेन इंटरनॅशनल' या नावाने कंपनी आहे. त्यातच गुन्हा दाखल असलेल्या सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून श्रीराम गोयल या कपडा व्यापाऱ्याकडून २ कोटी २५ लाख ३९ हजार ६२६ रुपये किंमतीच्या कपड्याच्या मालाची खरेदी केली. ते ९ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान कशेळी येथील राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समधून 'टॉपमेन इंटरनॅशनल' या कंपनीचा माल घेऊन गेले होते.
खोट्या सह्यांचा चेक देऊन फसवणूक:व्यवहाराच्या वेळी या डझनभर भामट्यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतानाही व्यापारी श्रीराम यांना सव्वा दोन कोटींचा खोट्या सह्यांचा चेक देऊन त्यांची फसवणूक केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापारी श्रीराम यांनी आज (गुरुवारी) १९ ऑक्टोंबर रोजी नारपोली पोलीस ठाणे गाठून १२ जणांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे तक्रार दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या १२ जणांचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत. भामट्यांनी व्यापाऱ्यांना हेरून त्यांची अशाप्रकारे फसवणूक करण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी वेळोवेळी व्यापाऱ्यांमध्ये जागृती केली जाते. मात्र, भामटे प्रत्येकवेळी व्यापाऱ्यांना ठगवण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. यामुळे व्यापाऱ्यांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.
हेही वाचा:
- Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
- Beed Crime : एटीएममधून पैसे काढता येत नसल्याने कार्ड अनोळखीच्या हाती देणे पडले महागात, 97 हजारांचा गंडा
- Financial Fraud Thane : पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक; परराज्यातील टोळीला अटक