महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संपत्तीवर डोळा ठेवून २ भावांचा सख्ख्या बहिणींशी लग्नाचा बनाव उघड; आई-वडिलांसह दोघे भाऊ गजाआड - Thane

दोघा भावांपैकी एकाचे आधीच लग्न झालेले असतानाही आरोपी दबडे कुटुंबीयांनी संगनमत करून फसवणूक केली. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आईवडिलांसह दोन्ही तरुणांना गजाआड करण्यात आले आहे.

आरोपी

By

Published : Mar 2, 2019, 6:36 PM IST

ठाणे - प्रॉपर्टीवर डोळा ठेवून २ भावांनी सख्ख्या बहिणींशी केलेला लग्नाचा बनाव उघडकीस आला आहे. आरोपींनी पैशांच्या आमिषाने भिवंडीतील एका सामाजिक महिला कार्यकर्तीच्या २ मुलींशी साखरपुडा केला. तसेच लग्नासाठी हुंडा म्हणून २ लाख रुपये रोख आणि दीड लाख रुपयांचे ५ तोळ्यांचे दागिने असा साडेतीन लाखांचा ऐवज हडप करून लग्नास नकार दिला आहे.

विशेष म्हणजे दोघा भावांपैकी एकाचे आधीच लग्न झालेले असतानाही आरोपी दबडे कुटुंबीयांनी संगनमत करून फसवणूक केली. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आईवडिलांसह दोन्ही तरुणांना गजाआड करण्यात आले आहे. गणेश बाळासाहेब दबडे (२४), विकास दबडे (२२), वनिता दबडे (४५), बाळासाहेब तातोबा दबडे (५२, सर्व राहणार, हनुमान नगर, कांदिवली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिता (नाव बदलून) यांच्याशी संपर्क करून त्यांच्या दोन्ही मुलींना लग्नाची मागणी घातली. मुलींच्या पसंतीनंतर लग्नासाठी हुंडा म्हणून एका मुलास १ लाख ५१ हजार रुपये व ५ तोळे सोने घेतले. त्यानंतर ३ जानेवारी २०१९ ला साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडला. दरम्यान आरोपी कुटुंबाने सुनिता यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांच्याकडे येणे जाणे सुरू केले.

दोन्ही मुलींचे आपल्या भावी पतींसोबत मोबाईलवर बोलणेही सुरू झाले. मात्र, बाळासाहेब दबडे यांनी अचानकपणे सुनिता यांना माझा मुलगा गणेशला तुमची मुलगी पसंत नसल्याचे सांगत लग्नाला नकार दिला. त्यामुळे सुनिता यांनी मानसिक धक्का बसला. त्यानंतर सुनिताच्या कुटुंबाने दबडे कुटुंबीयांची माहिती काढली असता, आरोपी गणेश दबडे याचे वर्षभरापूर्वीच मिरज येथील एका मुलीशी लग्न झाल्याचे समजले. त्यामुळे सुनिता यांच्या कुटुंबाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, लहान मुलीला दबडे कुटुंबाने लग्न मोडल्याचे सांगितले असता त्यामुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने तिने १८ फेब्रुवारीला रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा गंभीर प्रकार असल्याचे सुनिता यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेवून लबडे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२०, ४०६ (३४) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी गणेश, विकास, वनिता, बाळासाहेब दबडे यांना तत्काळ अटक करत न्यायालयात हजर केले. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details