ठाणे - मुरबाड तालुक्यातील सासणे येथील सतर्क गावकऱ्यांमुळे जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे जुन्याच विहिरींवर डागडुजी करून त्या जलयुक्त शिवार योजनेच्या विहिरी दाखवण्याचा घाट सरकारीबाबूंनी घातल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
जलयुक्त शिवार योजनेतील सरकारीबाबूंचा घोटाळा गावकऱ्यांनी उघड केलाय. मुरबाडमध्ये अधिकारी वर्ग टक्केवारीच्या हव्यासापोटी या योजनेला हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुरबाड मधीलसासणे गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जवळपास ५० लाख रूपये निधी हा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत चार विहिरींना अनुक्रमे ८ लाख ७६ हजार, ८ लाख ४९ हजार, ८ लाख ४४ हजार व ८ लाख ६१ हजार तसेच के. टी. बंधारा दुरुस्तीसाठी ४ लाख ६० हजार, बांधबंधीस्ती ३ लाख ५८ हजार इतका निधी मंजूर झाला आहे.
शासनाचा हा निधी पाण्यावर खर्च होत असताना येथील नागरिकांना मात्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या गावातील नळपाणी पुरवठा योजना गेली दीड वर्ष बंद आहे. त्यामुळे हातपंपावर पाणी भरून येथील महिला मेटाकुटीला आल्या आहेत. सासणेगावात चार विहिरी असून या विहिरींमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे. मात्र, आता याच विहिरीत भुसुरुंग लावून त्यावर नव्याने बांधकाम करून त्याच या योजनेच्या विहिरी दाखवण्याचा प्रयत्न सध्या अधिकारी वर्गाकडून सुरू आहे.
ठेकेदार आणि अधिकारी यांनी आर्थिक फायद्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तर या जुन्या विहिरींमध्ये भूसुरुंग स्फोट घडवल्यास या विहिरींचेही पाणी नष्ट होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. जुन्या विहिरी तशाच ठेऊन जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नव्याने जलस्रोत तयार करावेत, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. तसे न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही येथील गावकऱ्यांनी दिला आहे.