ठाणे - भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात देखील 7 नवे रुग्ण आढळले आहेत. या चौदा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 209 वर पोहोचला आहे.
भिवंडी शहरात 7 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यामध्ये नारपोली येथील 27 वर्षीय महिला ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये येथे उपचार घेत होती. तसेच गैबी नगर येथील 52 वर्षीय महिला मुंब्रा येथील रुग्णालयात दाखल होते. शहरातील चव्हाण कॉलनी येथील 20 वर्षीय महिला मुंबई येथील केईएम रुग्णालयात प्रसुतीसाठी गेली होती. त्याचबरोबर म्हाडा कॉलनी येथील 20 वर्षीय तरुण दिल्ली येथून आला होता. या तरुणाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर वेताळपाडा येथे राहणारे 58 वर्षीय व्यक्ती ही खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्याचबरोबर बाला कंपाउंड येथे राहणाऱ्या 62 वर्षीय वृद्धास डायलेसीसचा त्रास असून त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सातवा रुग्ण दर्गा रोड परिसरातील 44 वर्षीय पुरुष हे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत. अशा प्रकारे शहरात शनिवारी सात नवे रुग्ण आढळले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील या सात नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 119 वर पोहोचला असून, आतापर्यंत 63 रुग्ण बरे झाले आहेत, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागात देखील आज सात नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, या सात रुग्णांपैकी कशेळी येथे पाच रुग्ण आढळले आहेत. कारीवली व दिवे येथे एक एक नवा रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागातील सात नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा 90 वर पोहोचला असून, त्यापैकी 51 रुग्ण बरे झाले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 209 वर पोहोचला असून, त्यापैकी 114 रुग्ण बरे झाले आहेत. 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या 86 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.