महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी

भिवंडी

By

Published : Aug 24, 2019, 4:16 AM IST

Updated : Aug 24, 2019, 7:59 AM IST

03:58 August 24

भिवंडीच्या शांताई नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली आहे. दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळाची दृश्ये

ठाणे :- भिवंडी महापालिका क्षेत्रातील पिरानी पाडा भागातील गैबी नगर येथील चार मजली इमारत अचानकपणे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला तर 6 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिराज अंवर अन्सारी (वय 26) आणि जावेद कलामउद्दीन शेख (वय 40) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

दुर्घटनाग्रस्त इमारतचे प्लास्टर आणि काही भाग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळताना येथील रहिवाशांना दिसत होते. त्यामुळे रहिवाशांनी मध्यरात्री भिवंडी अग्निशामक दल व आपत्कालीन कक्षाला संपर्क करून इमारत कोसळत असल्याची माहिती दिली. तोपर्यंत या इमारतींमधील रहिवाशी आपल्या घरातील साहित्य बाहेर काढत होते. यावेळी पोलीस प्रशासन व महानगरपालिका कर्मचारी तसेच अग्निशामक दलाचे जवानही उपस्थित होते. त्याच सुमाराला एक वाजून 15 मिनिटांनी ही चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यावेळी या इमारतीमधील 8 रहिवासी इमारतीच्या मलब्या खाली दबले गेले. घटनास्थळी अग्निशामक दल व एनडीआरएफच्या जवानांनी या आठही जणांना मलब्याखालून बाहेर काढले. त्या आठ पैकी दोघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. यावेळी बचाव कार्य करत असताना अग्निशामक दल व एनडीआरएफचे काही जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. ही इमारत केवळ बारा वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. घटनास्थळी अद्यापही मलबा हटवण्याचे काम सुरू असून शेजारच्या इमारतींनाही ही इमारत कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे.

पालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षापासून धोकादायक इमारतींची संख्या बेसुमार वाढली आहे. सुमारे 978 धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या संरक्षणात उघड झाले आहे. या इमारतीमध्ये 2, 460 कुटुंब राहत असून सुमारे 15 हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात भिवंडीत विविध ठिकाणी इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, या इमारत दुर्घटनांची दखल घेऊन राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक इमारती पाडून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र, पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त दीपक कुरळेकर हे राज्य सरकारचे प्रतिनिधी असल्याने येथे गेल्या पाच वर्षापासून एका जागेवर बसून कागदी घोडे नाचवून कारवाई झाल्याचे दाखवत असल्याची टीका भाजपचे गटनेते निलेश चौधरी यांनी केली आहे.

Last Updated : Aug 24, 2019, 7:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details