ठाणे - अनधिकृत इमारतींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महापालिका क्षेत्रातील गैबी नगर पिरणी पाडा परिसरातील 4 मजली अनधिकृत मुन्नवर इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. अहमद अन्वर अली (वय 25) आणि मोहम्मद मोहम्मद हबीब शेख (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे, काही तासाआधीच इमारतीला तडे गेल्याने नागरिकांनी लक्षात आणून दिले होते. यानंतर या इमारतीमधील तब्बल बावीस कुटुंबांना घराबाहेर हलवण्यात आले होते आणि यानंतर अवघ्या एका तासातच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मात्र, सुदैवाने सर्व 22 कुटुंब घराबाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
तर या दुर्घटनेतील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत इमारत उभारणाऱ्या मालकाला शांती नगर पोलिसांनी केली अटक केली आहे. मुन्नवर अली अन्सारी (वय 39) असे अनधिकृत 4 मजली इमारत उभारणाऱ्या भूमाफियाचे नाव आहे. आज(शनिवारी) त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अधिक तपास शांती नगर पोलीस करीत आहेत,
या दुर्घटनेनंतर तब्बल तीन तासाने अग्नीशामक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मदत कार्य सुरू झाले. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी तीन जणांना सुखरूप बाहेर काढले होते. मात्र, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेदरम्यान कोणतीही यंत्रसामग्री नसल्याने व त्याबाबतचे कुशल ज्ञान नसल्याने आपत्कालीन कक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. याविषयी नागरिकांनी महापालिका प्रशासन विरोधात रोष व्यक्त केला आहे.
'मुन्नवर बिल्डिंग' या नावाने ओळखली जाणारी ही इमारत 8 ते 10 वर्षींपूर्वीच निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याने उभारल्याचे दिसून आले आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातील शांतीनगर मार्गावरील पिरानी पाडा येथे अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी मुन्नवर अन्सारी या भूमाफियांनी अनधिकृतपणे ही चार मजली इमारत उभारली होती. या इमारतीमध्ये एकूण बावीस कुटुंब वास्तव्यास होती. अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम केल्याने 23 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खालील बाजूस तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले असताना त्यांनी याबाबत महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला कळविले होते.