महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात डेंग्यूचे थैमान; चार रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू

पावसामुळे मुंब्रा, वर्तकनगर, नौपाडा परिसरात पाणी साचले आहे. नाल्याचे घाणपाणी लोकांच्या घरात घुसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला.अस्वच्छ परिसर आणि पालिका प्रशासनाच्या औषध फवारणीच्या अभावामुळे रहिवाशांना डेंग्युची लागण झाल्याचे चित्र आहे.

औषध फवारणी

By

Published : Jul 16, 2019, 11:04 AM IST

Updated : Jul 16, 2019, 11:45 AM IST

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. अस्वच्छ पाण्याच्या साठ्याने डेंग्यू, मलेरियाच्या डासांनी हैदोस घातला असून, २०१९ या वर्षात जून महिन्यापासून आतापर्यंत चार डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार करण्यात आले. यापैकी महिलेला उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. दुसरीकडे ठाण्यात डेंग्युचा प्रार्दुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे डेंग्युला आवर घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने थाळीनाद करून प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी आंदोलन करण्यात आले. तर मनसेने पाणी साचलेल्या आणि अस्वच्छ असलेल्या परिसरात युद्ध पातळीवर औषध फवारणी करा, असे निवेदन पालिका आयुक्तांना दिले आहे.

या वर्षात अतिवृष्टी होत असल्याने मुंब्रा, वर्तकनगर, नौपाडा परिसरात पाणी साचले. नाल्याचे घाणपाणी लोकांच्या घरात घुसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला.अस्वच्छ परिसर आणि पालिका प्रशासनाच्या औषध फवारणीच्या अभावामुळे रहिवाशांना डेंग्युची लागण झाल्याचे चित्र आहे.

औषध फवारणी
मुंब्रा परिसरात चौघांना लागण, दोघांचा मृत्यू

मुंब्रा कौसा परिसरात राहणाऱ्या चार जणांना डेंग्युची लागण झाली होती. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एक उपचार घेत आहे. तर एका पोलीस नाईक महिलेला उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. जून महिन्यात मुंब्रा परिसरातील चांदनगर येथील १४ वर्षाच्या मुलाचा डेंग्युने मृत्यू झाला यानंतर २७ जून रोजी मोहम्मद आकिब कमल अहमद शेख या ७ वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू डेंग्युने झाल्याची माहिती वडील कमल मोहम्मद शेख यांनी दिली. २२ जूनला आकिबला ताप आला होता. डॉक्टरांनी त्याला तपासणी करण्यास सांगितले. २४ जूनला रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ज्युपिटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने आकिबला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकिबच्या अनेक अवयवांवर डेंग्युचा परिणाम झाला होता. २७ जूनला वाडिया रुग्णालयात अकिबचा मृत्यू झाला.


महिला पोलीस नाईकही डेंग्यूच्या विळख्यात

मुंब्रा परिसरात फोफावलेल्या डेंग्युच्या विळख्यात मुंबईमध्ये कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आणि मुंब्रा परिसरात कदर पॅलेस येथे राहणाऱ्या महिला पोलीस नाईक शगुप्ता इब्राहिम सय्यद (वय, ४०) यांनाही डेंग्यूने ग्रासले होते. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असून त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर मुंब्रा येथील रशीद कंपाउंड मधील एका महिलेला देखील डेंग्युची लागण झाल्याचे समोर आले आहे. महिलेला डेंग्यू असल्याचे स्पष्ट होताच, उपचारासाठी सोमवारी मुंबईच्या केईम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पावसामुळे नाल्याचे घाणपाणी साचलेल्या परिसरात तातडीने औषध फवारणी करून डेंग्यूवर मात करता येईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

वर्तकनगरमध्ये देखील आढळले डेंग्यूचे रुग्ण

मुंब्रा पाठोपाठ ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात भीमनगर, म्हाडा इमारतीच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. यामुळे परिसरात कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले. यामुळे या परिसरातही डेंग्युची लागण झाली आहे. वर्तकनगर भीमनगर परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. नीता साळुंखे (वय, ४०) आणि इमारत क्रं ६५ येथे राहणारी तरुणी शेरॉन काळपूड (वय, २४ रा.इमारत क्रं ६५) असे रुग्णांची नावे आहेत. यांना गोधिना ठाण्याच्या बेथनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अस्वच्छ परिसर आणि डेंग्यू पसरलेल्या ठिकाणी त्वरित औषध फवारणी करावी. खासगी रुग्णालय डेंग्यूची माहिती पालिका आरोग्य विभागाला देत नाहीत अशा खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे ओवळा-माजिवडा विधानसभा शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

Last Updated : Jul 16, 2019, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details