ठाणे - भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथे जिलानी इमारत कोसळल्याची घटना २१ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत ३८ नागरिकांचा मृत्यू, तर २३ रहिवासी जखमी झाले होते. या प्रकरणी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकासह मनपाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त, तसेच बिट निरीक्षक व लिपिक या चौघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -अंबरनाथ : रिपाईच्या माजी शहराध्यक्षाची तहसीलदाराला गोळ्या घालण्याची धमकी
अटक कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसह या अवैध बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या मनपाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुदाम नारायण जाधव यांच्यासह तत्कालीन बिट निरीक्षक सुनिल सिताराम वगळ, भूभाग लिपिक प्रफुल्ल प्रकाश तांबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जिलानीच्या बांधकाम विकासकाला ५ महिन्यानंतर बेड्या...
दुर्घटनेत ३८ जणांचा बळी घेणाऱ्या जिलानी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे अवैध बांधकाम केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक मोहमंद मुख्तार गुलाम रसूल फंडोले (वय ७६ वर्षे) याच्यावर विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल त्यावेळी केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून फंडोले फरार झाला होता. तसेच, त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याचा शोध घेऊन नारपोली पोलिसांनी त्यास काल अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.