ठाणे : काही दिवसांपूर्वी डोंबिवली-कल्याण रोडवर असलेल्या खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरचा अपघाती मृत्यू नव्हे, तर त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मानपाडा पोलिसांनी उघड केला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे नसतानाही मानपाडा पोलिसांनी या हत्येप्रकरणी ४ लुटारू मारेकऱ्यांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. रिहान बशीर शेख (रा. कचौरेगाव), सागर चंद्रमौली पोनाला (रा. चक्कीनाका), सुमित चितामण सोनवणे (रा. नांदीवली गाव) आणि एक अल्पवयीन मुलगा असे चौघे आरोपी आहेत. तर कृष्णमोहन तिवारी (४७) असे हत्या झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअरचे नाव आहे.
गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल
शनिवारी (11 सप्टेंबर) दुपारी 12 च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी. एस. होरे यांना आढळून आले. या व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असतना दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
खोलात जाऊन हत्येचा उलगडा
डोंबिवलीचे एसीपी जय मोरे, व.पो.नि. दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. बाळासाहेब पवार, स.पो.नि. अविनाश वनवे, अनिल भिसे, काटकर, कदम, चौधरी, यादव, घुगे, सोनवणे, भोसले, डी. एस. गडगे, किनरे, पवार, पाटील, कांदळकर, आर. जी. खिलारे, कोळी, मंझा या पथकाने खुनाचे गूढ उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात तपास करत सीसीटीव्ही व तांत्रिक लोकेशनच्या आधारे हत्येचा उलगडा केला.