महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार्यकारी अभियंता हल्ला प्रकरण : ४ संशयित जेरबंद, हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात

न्यायालयाने आरोपींना अधिक चौकशीसाठी २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

४ संशयित जेरबंद

By

Published : Mar 30, 2019, 9:55 AM IST

ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर आठवड्यापूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी ४ संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे. या हल्ल्यामागे कोण आहे ? आणि हा हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला ? याचा पोलीस शोध घेत आहेत. परशुराम वारकरी, सचिन पाटील, मयूर सुर्वे आणि उमेश राऊत अशी या आरोपींची नावे आहे.

कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावरील हल्ल्याचे कारण अजुनही गुलदस्त्यात आहे

डोंबिवली रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या स्कायवॉकवर शुक्रवारी (२२ मार्च) सायंकाळी पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पाटील यांच्या पाठीवर, छातीवर आणि पोटावर ३ ते ४ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केले होते. त्यानंतर पोलिसांनी या परिसराची कसून पाहणी करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या सीसीटीव्हीत मारेकऱ्यांचे चेहरे टिपले गेले.


सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी परशुराम वारकरी आणि सचिन पाटील या दोघांना केडीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यावर वार केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. या दोघांसोबतच मयूर सुर्वे आणि उमेश राऊत या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयूर सुर्वे वगळता सर्वांवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.


शुक्रवारी या चौघांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या हल्ल्यामागचे मुख्य सूत्रधार कोण ? याचा उलगडा चौकशीतून समोर येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details