नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोलीतील डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेल्या ९ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. यामध्ये एक टक्का कमिशन भेटत नाही म्हणून जाणीवपूर्वक रखडले असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी महासभेत केला.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ऐरोलीत डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाचे पाहिल्या टप्प्यात उद्घाटन झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी आहे. या कामाला दिरंगाई होत असल्याने नगरसेवक संजू वाडे यांनी हे काम कधी होईल? असा सवाल महासभेत विचारत शहर अभियंत्याच्या कार्यशैलीवर घणाघात केला. हे काम होत नाही तोपर्यंत २४ डिसेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. यावर शहर अभियंता यांनी या भवनाचे काम अडीच महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. यावर माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना धारेवर धरले. या भवनाचा मुख्य गाभा डोम आहे. त्यावर कधीतरी चढून कामाची पाहणी केली आहे का? असा सवाल करत हे काम एक टक्का कमिशनपोटी जाणीवपूर्वक रखडवले जात आहे. तसेच हे कमिशन कोण मागत आहे? याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कमिशन घेतले जात आहे, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे हे काम लवकर करण्यात यावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.