ठाणे- महाराष्ट्र शासनाने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2020 पक्षी सप्ताह जाहीर केला आहे. त्यानुसार भिवंडी तालुक्यातील तब्बल दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचवण्यासाठी वनाधिकारी प्रत्येक गावो-गावी जाऊन ग्रामस्थांना एकत्र करून जंगल आणि पक्षी वाचवण्याचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पक्षी आणि जंगल वाचवण्यासाठी आता गावकरी पक्षी सप्ताहातून पुढाकार घेताना पाहावयास मिळत आहेत.
भिवंडी तालुक्यातील दाभाड, आदिवासी पाडा, पहारे, आवळे, विश्वगड, कुशिवली, गोंड पाडा, राऊत पाडा, खंबाला, जावईपाडासह बहुसंख्य गाव आणि पाड्यात वनाधिकारी साहेबराव खरे हे जाऊन गावातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, समाजसेवक, महिला आणि नागरिकांना एकत्र घेऊन त्यांना जंगलाचे रक्षण कसे करायचे, वणवा कसा टाळायचा, पशु-पक्षांचे रक्षण कसे करायचे, याची सविस्तर माहिती देत आहेत. त्याचप्रमाणे जंगलात नेऊन वनाधिकारी खरे हे झाडांची माहिती, पक्षांची घरटी, पक्षांची माहिती देऊन वन्यजीव कायदा आणि पक्षी संवर्धन या विषयी जनजागृती करीत आहे.