महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime: बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या आठ ट्रकवर कारवाई, वनविभागाकडून गुन्हा दाखल - वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी

मुंबई - नाशिक महामार्गावरील आसनगाव येथे विना परवाना लाकूड वाहतूक करणारे आठ ट्रक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. ट्रकमध्ये बाभूळ प्रजातीच्या लाकडांमध्ये दडवून ठेवलेल्या उंबर, मोह, आंबा, निलगिरी आदी विविध प्रकारची लाकडे आढळून आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी व लक्ष्मण चिखले यांनी सांगितले.

Thane Crime
८ ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

By

Published : May 16, 2023, 6:20 PM IST

ठाणे: परवानगीची आवश्यक्ता नसलेल्या बाभूळ प्रजातीच्या जळाऊ लाकडांमध्ये अन्य लाकडे दडवून त्यांची चोरटी वाहतूक करणारे, तब्बल ८ ट्रक शहापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. मुंबई - नाशिक महामार्गावरील तालुक्यातील खर्डी व आसनगाव येथे पाळत ठेऊन असलेल्या वनाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार असे दोनही दिवस सापळा रचून, ट्रकचालकांना ताब्यात घेतले. या ८ ट्रकमधील लाखो रुपये किमतीचे तब्बल दिडशे घनमीटरहुन अधिक आकार असलेल्या लाकडांची मोजदाद सुरू आहे.



लाकडांची बेकायदेशीर वाहतूक:शहापूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी व खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण चिखले यांना लाकडांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार मुंबई - नाशिक महामार्गावर वनपथकासह पाळत ठेवली. आसनगाव येथील परिवार गार्डन हॉटेल येथे १ ट्रक तर खर्डी येथील सिटीझन हॉटेल येथे उभ्या असलेल्या ७ ट्रकचा संशय आल्याने त्याबाबत चौकशी केली. त्यामध्ये शासन नियमानुसार परवानगीची आवश्यक्ता नसलेल्या बाभूळ प्रजातीचे जळाऊ लाकूड असल्याचे सांगण्यात आले. मात्र वनाधिकाऱ्यांनी आठही ट्रक चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामध्ये बाभूळ प्रजातीच्या लाकडांमध्ये दडवून ठेवलेल्या उंबर, मोह, आंबा, निलगिरी आदी विविध प्रकारची लाकडे आढळून आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी व लक्ष्मण चिखले यांनी सांगितले.



गेल्या ३ महिन्यात २ वेळा कारवाई: संगमनेर येथून भिवंडी येथे जाणाऱ्या या आठही ट्रकचालकांना वनाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या ट्रकमध्ये बाभूळ व्यतिरिक्त कोणकोणत्या प्रजातीच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती, हे पाहण्यासाठी ट्रकमधील लाकडांची आसनगाव येथील वनकार्यालयाच्या आवारात मोजदाद सुरू आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या ३ महिन्यात संगमनेर येथून लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाकडून या आधी देखील २ वेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही संगमनेर येथून बाभूळ प्रजातीच्या लाकडांमध्ये वनविभागाच्या परवानगीची आवश्यक्ता असणाऱ्या, अन्य प्रजातींच्या लाकडांची चोरटी वाहतूक होत असल्याने संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे.



वृक्षवल्लीचे समृद्ध राखणे गरजेचे: शहापूर, खर्डी, वैतरणा तालुक्यातील वनश्रीने नटलेला हिरवागार परिसर व तानसा तळ्याच्या पाणलोट क्षेत्रातील तानसा अभयारण्य आहे. दूरवर पसरलेल्या तानसा तळ्याचा जलाशय पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. जंगलातील विभिन्न वन्य जीवसृष्टीची तहान भागवण्याचे कामही हेच तळे करते. मुंबईपासून दूर नसल्याने आठवड्यांच्या शेवटी निसर्ग प्रेमींचे पावले इकडे आपोआप वळतात. तानसा अभयारण्याभोवतीचे जंगल कळंब, बांबू, खैर सारख्या वृक्षवल्लीने समृद्ध आहे. मात्र निर्सगाच्या या वृक्षवल्लीचे समृद्ध राखणे गरजेचे असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शहापूर तालुक्यात असलेले सुमारे तीनशे वीस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात तानसा वन्यजीव अभयारण्य पसरले आहे. मात्र तानसा अभयारण्यात बेसुमार जंगल तोड होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.


हेही वाचा -

  1. Thane Crime व्यावसायिक लग्नकार्यी गेले अन् चोरट्याने मारला घरावर डल्ला
  2. Husband Knife Attack On Wife नोकरीवाली बायको दे गा देवा पण या नवऱ्याला चढला माज बायकोवर चाकूहल्ला
  3. Thane Crime दुकान चालु रखना है तो अनाज की बोरी होन्नाच गुंडांची धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details