ठाणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी (८ जून) दहावीचा निकाल घोषित केला. दहावीत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. मात्र, संभाजीनगर येथे दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मिठाईच्या दुकानात आणलेले पेढे खाल्याने उत्तीर्ण विद्यार्थिनीसह एकाच कुटुंबातील पाच, अशा सात जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्व बाधितांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असून धोका टळला आहे.
या कुटुंबाने घरानजीकच्या हनुमान डेअरी अॅण्ड बंगाली स्वीट्स, या मिठाईच्या दुकानातून मिठाई आणल्याची माहिती समोर आली आहे.
काल (८ जून ) जाहीर झालेल्या वर्ग दहावीच्या निकालात संभाजीनगर येथील दुर्गानंद सदगीर ही विद्यार्थिनी ५६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. मुलगी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात कुटुंबीयांनी मिठाईच्या दुकानातून आणलेले पेढे खाल्ले. पेढे खाताच उलटी व जुलाब सुरू झाला. दुर्गा या विद्यार्थिनीसह सोमनाथ बिन्नर, योगेश बिन्नर,गणेश सदगीर, मयूर बिन्नर, गुरुनाथ सदगीर, कैलास बेडगे, अशा ७ जणांना नजीकच्या हारगुण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दहावीत पास झाल्याच्या आनंदावर विरजण, वाटलेल्या पेढ्यांतून सात जणांना विषबाधा पेढे आणि तत्सम मिठाईसारख्या खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाब सुरू झाले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर उमेश गौतम यांनी दिली.