ठाणे :महाराष्ट्र राज्यात आरोग्यास घातक असलेला सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही गुजरात राज्यातून विविध चोरट्यामार्गे आयात केला जातो. कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची आणि पान मसाल्याची दररोज तस्करी केली जाते. त्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. यादरम्यान भिवंडी शहरातील दोन इमारतींमधून सव्वा पाच लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.
खाडीपार भागात पथकाची छापेमारी :गुजरात राज्यातून प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याची भिवंडीतील रहिवासी इमारतीमध्ये साठवणूक करून त्याची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर अन्न व औषध प्रशासनाला २३ जुलै रोजी मिळाली होती. त्या माहितीनुसार भिवंडी शहरातील खाडीपार येथील क्रांतीनगर परिसरातील कलाम इमारतीमधील पहिल्या मजल्यावर विभागाच्या पथकाने छापा टाकून झडती घेतली. यावेळी येथे अवैध, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. हा संपूर्ण माल जप्त करण्यात आला असून याची किंमत ३ लाख ८९ हजार रुपये आहे. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विविध कलमांन्वये निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.