ठाणे - बासरी उत्सवाच्या बाराव्या पर्वाची सुरुवात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ‘फ्लूट सिम्फनी’ने झाली. यामध्ये ८० बासरीवादक आणि २० व्हायोलीनवादक तसेच तबलावादक उत्साद फझल कुरेशी आणि व्हायोलीनवादक मिलिंद रायकर सहभागी झाले होते.
ठाण्यात बाराव्या बासरीवादन महोत्सावाचा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संगीत मार्तंड पंडित जसराज यांना शास्त्रीय संगीतातील ७ दशकांच्या अतुलनीय योगदानासाठी गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडित जसराज यांना बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते ‘फ्लूट लिजेंड पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यानंतर बासरीवादक राकेश चौरसिया, शशांक सुब्रमण्यम, तबलावादक सत्यजीत तळवळकर आणि मृदंगवादक जयचंद्र राव केयु यांच्यामध्ये ‘फ्लूट जुगलबंदी’ रंगली.