ठाणे:लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये २२ जून रोजी महिला प्रवाशांच्या बोगीत पुरुष प्रवाशी प्रवास करत असतानाच, सोनाली गुजराथी नावाची महिला त्याच बोगीतून प्रवास करीत होती. त्यावेळी त्यांनी पुरुष प्रवाश्यांना तुम्ही बसलात ठीक आहे. मात्र, महिलांना बसण्यासाठी जागा द्या अशी विनंती केली; मात्र या पुरुष प्रवाशांनी महिलांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. ही बोगी महिलांसाठी राखीव आहे. तुम्ही जनरल बोगीमध्ये जा, मात्र त्यांनी जागाही दिली नाही आणि जनरल बोगीतमध्ये देखील ते प्रवासी गेले नाहीत. हा सगळा घडलेला प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या सोशल मीडिया ग्रुपवर त्या महिला प्रवाशांनी घटनाक्रम टाकला. विशेष म्हणजे या महिला बोगीत पुरुष फेरीवाले देखील वावर करत असतात, असे व्हिडिओ आरपीएफ ग्रुपमध्ये टाकण्यात आले होते.
डब्यातून महिला पोलीस गायब :महिला बोगीत महिला पोलीस कर्मचारी ड्युटीवर नव्हते. विशेष म्हणजे, पुष्पक एक्सप्रेस इगतपुरीला आली असता प्लॅटफॉर्मवर पोलीस उभे असताना पोलिसांचे महिला राखीव बोगीकडे लक्ष गेले तरी देखील पोलीस त्या बोगीकडे आले नाहीत. तर महिला प्रवासी सोनाली यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आवाज देऊन हात केला. मात्र ती महिला पोलीस मोबाईल फोनवर बोलण्यास मग्न होती.
अन् पुरुष प्रवाशी पळाले :दोन तासांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस आल्यानंतर फलाटावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की, बोगीमध्ये पुरुष प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढा. दोन तासांपूर्वी व्हिडिओ रेल्वेच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आरपीएफ व कर्मचारी अधिकाऱ्यांनी तत्काळ कल्याण रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. रात्रीच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्टेशनवर येताच महिला बोगीतील पुरुष प्रवाशांना ताब्यात घेत कारवाई केली. तर आरपीएफला पाहून डब्यातील काही पुरुष प्रवाशांनी पळ काढला होता. यावेळी महिलांच्या डब्यांमधील सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी देखील महिला प्रवाशांनी केली.