ठाणे - पाच महिन्यांपूर्वी केलेल्या शिवीगाळीच्या रागातून पुन्हा मोबाईलवरून शिवीगाळ केल्याने वाद उफाळून आला. मात्र टोकाला गेलल्या वादातून झालेल्या सशस्त्र हाणामारीत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तर मेहुणा-भावोजी असे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये घडली असून या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून काही तासांतच पाचही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महेश दिलीप गुंजाळ (22), निखिल सुरेश माने (23), जयेश अशोक जुवळे (22), आशिष अनिल वाल्मिकी (22) आणि श्रीनिवास बसप्पा सुगाला (23) अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे असून हे सर्व हल्लेखोर डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात राहणारे आहेत. तर या पाच जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शिवाजी वामन खंडागळे (25) हा तरुण जागीच ठार झाला, तर संतोष विलास लष्करे (34) व राजू धोत्रे हे मेहुणा-भावोजी गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात राजू शिवराम धोत्रे (29) याच्या जबानीवरून रामनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईलवरून शिवीगाळ केल्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या संतोष लष्कर याच्या मुलीचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वाढदिवस होता. या वाढदिवसाला मेहुणा राजू धोत्रे आणि त्याचा मित्र मृत शिवाजी खंडागळे हे दत्तनगरमध्ये राहणारा संतोष लष्कर याच्या घरी गेले होते. तेथे ओली पार्टीही झाली. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे यांच्यात गप्पा सुरू होत्या. संतोष लष्कर याने मेहुणा राजू धोत्रे याला पाच महिन्यांपूर्वी आरोपी महेश गुंजाळ याने आपणास शिवीगाळ केल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या राजू धोत्रे याने महेश गुंजाळला फोन करून माझ्या भावोजीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्यानंतर राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे हे तिघे विनाहत्यार चालत प्रगती कॉलेजमागच्या कार्यालयाजवळ राहणाऱ्या आरोपी महेश गुंजाळ याला जाब विचारण्यासाठी गेले.
तेथे गेल्यावर गुंजाळ आणि या तिघांमध्ये खडाजंगी सुरू झाली. तू मला आता फोनवर शिवीगाळ का केली? असा महेश गुंजाळला धोत्रे यांनी जाब विचारला. वातावरण तापल्यानंतर आधीच हत्यारांसह तयारीत असलेल्या महेश गुंजाळ व निखील माने या दोघांनी त्यांच्याकडील लोखंडी रॉडने, तर जयेश जुवळे व अण्या उर्फ श्रीनिवास सुगाला यांनी त्यांच्याकडील स्टंपने, तर आशिष वाल्मीकी याने त्याच्या हातातील तलवारीने राजू धोत्रे आणि त्याचा भावोजी संतोष लष्कर यांच्या डोके, पाठ, पायावर हल्ला चढवला. तर राजूचा मित्र शिवाजी खंडागळे याच्यावर महेश गुंजाळ व निखील माने या दोघांनी मिळून डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात घाव वर्मी बसल्यामुळे शिवाजी खंडागळे हा जागीच ठार झाला. त्यानंतर पाचही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या राजू धोत्रे व त्याचा भावोजी संतोष लष्कर या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ठार झालेल्या शिवाजी खंडागळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कल्याणच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. तर दुसरीकडे या हल्ल्यातील जखमी राजू धोत्रे याच्या जबानीवरून महेश गुंजाळ, निखील माने, जयेश जुवळे, अण्या सुगाळा, आशिश वाल्मीकी या हल्लेखोरांच्या विरोधात भादंवि कलम 302, 324, 323, 504, 506, 141, 143, 147, 148, 149 प्रमाणे शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल केला. वपोनि सुरेश आहेर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोजसिंग चौहाण, हवा. शिंदे, जाधव, वाघ, किर्दत्त, खिलारे, पिचड, तोडकर, जाधव या पथकाने गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांतच फरार हल्लेखोरांच्या मुसक्या बांधल्या. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे अद्याप हाती लागली नाहीत. शनिवारी सर्व आरोपींना कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वपोनि सुरेश आहेर यांनी सांगितले.