नवी मुंबई - एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. तर अनेक जणांचा या कोरोनाने बळी गेला आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे मात्र मासेमारीसाठी लागणाऱ्या होड्या आणि लहान डिझेल इंजिनच्या बोटींसाठी घेतलेल्या बँकांची लाखो रुपयांच्या कर्जाचे हप्ते, व्याजाची रक्कम, अतिवृष्टी वादळ, जलप्रदूषण यासारख्या अनेक समस्यांना नवी मुंबईतील लहान मोठ्या मच्छिमार लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांच्यावर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे.
नवी मुंबईतील स्थानिक कोळी मच्छिमार बांधव पिढ्यानपिढ्या पासून लहान मोठ्या होड्या आणि बोटीमधून मासेमारी करतात. मासेमारीचे जाळे आणि होड्यांच्या खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते,व्याज लॉकडाऊनमुळे वेळेवर भरता आले नाही. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत पारंपारिक मासेमारी व्यवसाय सलग चार महिने लयास गेलेला आहे. त्यातच नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील काही रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी थेट खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे जल प्रदूषणाने हजारो मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशा नानाविध समस्यांमुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारीवर पोट असलेल्या येथील मच्छिमार हलाखीचे जीवन जगत असल्याची खंत मच्छीमार बांधवान मधून व्यक्त करण्यात येत आहे.