ठाणे -अठरा विश्व दारिद्रय आणि विस्थापित आयुष्यांचा कलंक पुसण्यासाठी सरसावलेल्या सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्याने आणखी एक परीक्षा उत्तीर्ण केली. शाळेचा दशरथ युवराज पवार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत 55 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. सिग्नल शाळेच्या हा विद्यार्थी दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने आयुष्याची आणखी एक लढाई जिंकली.
समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. तीन हात नाक्यापुलाखाली राहत असलेल्या आणि महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील स्थलांतरीतांच्या मुलांसाठी या उपक्रमाची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या शाळेतील दोन विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले. यानंतर बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यात शाळेचा दशरथ युवराज पवार हा विद्यार्थी 55 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. तर शाळेचा आणखी एक विद्यार्थी मोहन काळे हा सध्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे.
महापौर नरेश म्हस्के, ठाणे मनपातील शिक्षण मंडळाचे सभापती विकास रेपाळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे दशरथला या विद्यार्थ्याला हे यश मिळवता आले.