नवी मुंबई- थंडीची सुरुवात झाली असून रंगाने लाल व आकर्षक अशा स्ट्रॉबेरीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरीच्या जवळपास सात ते आठ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. मोसमी लालसर आकर्षक अशी स्ट्रॉबेरी बाजारात सर्वांनाच भुरळ घालत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवी मुंबईतील वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बारात स्ट्रॉबेरी दाखल होत असते. यावर्षीही बाजारात स्वीट चार्ली, विंटर डाऊन, नाबिया या जातीची स्ट्रॉबेरी आली आहे. डिसेंबर महिन्यापासून हंगामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्यानंतर बाजारात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. स्ट्रॉबेरीच्या कामरोझा जातीची आवक दोन आठवड्यानंतर होणार असल्याची माहिती फळ विक्रेते संजय पानसरे यांनी दिली. ही स्ट्रॉबेरी इतर स्ट्रॉबेरीच्या जातीच्या तुलनेत आकाराने मोठी असून, चवीलाही मधूर असते. त्यामुळे तिला अधिक मागणी मिळते, असेही फळविक्रेते यांनी सांगितले.
सद्यस्थितीत घाऊक बाजारात बाजारात ५०० ग्रॅमच्या पेटीची किंमत ८० ते १०० रुपयांपर्यंत आहे. आवक वाढण्यास सुरुवात झाल्यांनतर हे दर आणखीनच खाली येण्यास सुरुवात होईल. स्ट्रॉबेरीचे उत्पादन होणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीमधून नवी मुंबईतील घाऊक बाजारात स्ट्रॉबेरी येत असल्याने दर तसे आटोक्यात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी खरेदी करत आहेत.