ठाणे -विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 744 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, 316 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांकडून 2744 वाहनांवर कारवाई
दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणे, नियम न पाळणे, विनाकारण फिरणे अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य भागासह प्रत्येक सिग्नलनिहाय नाकाबंदी केली आहे.
राज्यात पुन्हा नव्याने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु असे असताना देखील दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणे, नियम न पाळणे, विनाकारण फिरणे अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य भागासह प्रत्येक सिग्नलनिहाय नाकाबंदी केली आहे. नियम न पाळता प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन जप्त करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ठाणे, कळवा-मुंब्रा, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर आदी भागातून गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2 हजार 744 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यापैकी 316 वाहने जप्त करण्यात आली आहेत. जमा केलेल्या वाहनांमध्ये 249 दुचाकी, 56 तीनचाकी (रिक्षा) व 11 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तर 13 लाख 9 हजाराचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.