ठाणे: मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यात असलेल्या वेहळोली औदयोगिक वसाहतीतील (एस.के.वाय. )कृष्णा एव्होशन या प्लास्टिक कारखान्याला मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या कारखान्यामध्ये लागलेल्या आगीचे तांडव गेल्या ७ तासापासून सुरु आहे.
कारखान्यातील भीषण आगीचे तांडव ७ तासापासून सुरूच कारखान्यात एकूण ५ प्लांट असून ५०० कामगार कार्यरत ..
शहापूर तालुक्यातील वाशिंद ते असनगाव दरम्यान मुंबई - नाशिक महामार्गावर औदयोगिक वसाहत आहे. या वसाहतीत कृष्णा एव्होशन या नावाने प्लास्टिकच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. या कारखान्यात सुमारे ५०० कामगार काम करीत असून कारखान्यात ५ प्लांट आहेत. यापैकी एका प्लांटला अचानक पाहाटेच्या सुमाराला आग लागली होती. आग लागताच रात्र पाळीत काम करणाऱ्या कामगारांनी बाहेर पळ काढला. यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधींच्या प्लास्टिकच्या विविध वस्तूसह कच्चा माल जळून खाक झाला आहे.
भीषण आगीचे लोट व धूर संपूर्ण परिसर औद्योगिक वसाहतीत ..
आगीच्या घटनेची माहिती मिळताच आतापर्यत भिवंडी, कल्याण - डोंबिवली ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनस्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. हा संपूर्ण परिसर औद्योगिक वसाहतीचा असल्याने इतरही लगतच्या कंपन्यांना आगीची झळ लागू नये म्हणून अग्निशमन दलाचे जवान लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे या आगीने काही क्षणात रुद्ररूप धारण केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीषण आगीचे लोट व धूर संपूर्ण परिसर औद्योगिक वसाहतीत पसरला आहे. अद्यापही आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्याने दिली असून आग इतरही कारखान्यांना पसरण्याची भीती निर्माण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - श्रध्दा कपूरने 'सायना' चित्रपट का सोडला? या प्रश्नाला अमोल गुप्तेने दिली बगल