ठाणे - भिवंडीतील अंजूरफाटा येथील नारपोलीच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत रात्री 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
भिवंडीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आग; आगीत बँकेचे नुकसान - bank of maharashtra bhiwandi
नारपोलीच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत रात्री 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
भिवंडी - ठाणे रोडवर अंजूरफाटा परिसरात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे. या शाखेत रविवारी रात्रीच्या १० वाजून ४५ मिनिटाने मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने स्थानिक नागरिकांनी बँकेत आग लागल्याची अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र बँकेच्या शटरला कुलूप लावले असल्याने क्षणाचा विलंब न लावता जवानांनी पोलिसांच्या मदतीने बँकेचे शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, बँकेतील एका प्रिन्टरमध्ये शॉट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीत तो प्रिन्टर जळून खाक झाला. त्यामुळे बँकेत सर्वत्र काळा धूर पसरला होता. यामुळे काही साहित्याचे नुकसानही झाले. घटनास्थळी नारपोली पोलिसांनी पंचनामा करीत या आगीची नोंद पोलीस ठाण्यात करून अधिक तपास सुरु केला आहे.