ठाणे - भिवंडी शहरात अंजूर फाटा येथील चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. या परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यामध्ये ही आग लागली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा आहे. यामुळे आगीने भीषण रुप धारण केले.
BREAKING: भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल घटनेची मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच आतापर्यंत या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र कपड्याचा साठा असल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भिवंडीत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होईल अशी परिस्थिती टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे. यानंतरच आग लागण्याच्या मुख्य कारणाचा खुलासा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
17 नोव्हेंबर : कल्याणच्या हायप्रोफाईल इमारतीमधील घराला भीषण आग; जीवितहानी नाही
कल्याण पश्चिम परिसरातील एका हायप्रोफाईल इमारतीमधील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, वेळेतच अग्निमशन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली.
कल्याण पश्चिम भागात गोदरेज हिल परिसरात टेकडीवर कॅसोरीन नावाची हायप्रोफाईल इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. या फ्लॅटमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली. खळबळजनक बाब म्हणजे आग लागली त्यावेळी काही सदस्य घरामध्येच होते. या आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले होते.
या आधीही भिवंडीतील एका कपड्याच्या गोदामाला लागली होती आग
भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर दोन तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. संबंधित गोदामाच्या बाजूलाच थोड्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. मात्र, वेळेत आग विझल्याने मोठा अनर्थ टळला.