ठाणे - कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या धुराचे मोठे लोट नागरी वस्तीत पसरल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
कचऱ्यापासून तयार झालेल्या मिथेन वायूमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. या आगीमुळे कल्याण शहराच्या पश्चिम भागात मोठय़ा प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले होते. डम्पिंग ग्राऊंडला आग लागते की, लावली जाते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आग लागण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तीन वर्षात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला अनेकवेळा आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. मागील वर्षी दोन ते तीन वेळा येथे भीषण आग लागली होती. २०१६ मध्येही सहावेळा आग लागल्याचा प्रकार घडला होता. अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंडमध्ये आगीच्या घटना घडत असताना, प्रशासन अजूनही या प्रकारावर शांत आहे.