ठाणे : पत्नीने कबाडकष्ट करून बांधलेल्या घराला भीषण आग लागून डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावातील झिपा घोरड यांच्या घरात घडली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले. तर आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरू नये म्हणून गावकऱ्यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा मारा करून सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
घराला अचानक आग :मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात झिपा घोरड हे कुटुंबासह राहतात. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. त्यावेळी घोरड यांचे कुटुंबीय गाढ झोपेत होते. पहाटे दोनच्या सुमारास गावातील नागरिकांनी घोरड यांच्या घराकडे धाव घेऊन घरातील कुटूंबाला जोराजोरात आरडाओरड करत केली. मधुकर घोरड यांनी आवाज ऐकून घराचा दरवाजा उघडला असताना, आपलेच घर जळत असल्याचे समजले. त्यावेळी आगीचा उडालेला भडका पाहता घरातील सर्व धान्य कपडे व किंमती वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. या आगीतून कुटूंब बचावले आहे.
दुर्घटना टळली :तर घरातील कुटूंबाला बाहेर काढून भडकलेली आग इतरत्र पसरू नये, यासाठी गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत मुरबाड नगरपंचायतचे अग्नीशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संपूर्ण गावावरील दुर्घटना टळली. मात्र या आगीत झिपा घोरड यांच्या वयोवृद्ध पत्नीने काबाडकष्ट करून बांधलेले घर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संसाराची राखरांगोळी झाली.