ठाणे - उल्हासनगर शहरातील पवई चौक परिसरात असलेल्या साई शिव या सहा मजली इमारतीच्या तळघरात प्रिया बॅग हाऊस कारखान्याला सकाळी साडे नऊच्या सुमाराला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आण्यासाठी सहा तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. सध्या ही आग आटोक्यात आली असून याठिकाणी कुलिंगचे काम सुरू आहे. महाशिवरात्रीमुळे आज प्रिया बॅग हाऊस कारखाना बंद असल्याने तळघरातील कारखान्यात कोणीही कामगार नव्हते.
कारखान्यात बॅग बनविण्यासाठी लागणारे रेगझिन व लेदरचा कच्चामाल मोठ्याप्रमाणात साठवून ठेवला होता. त्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले होते. तर आग पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सतत पाण्याचा मारा सुरू ठेवला होता. मात्र, परिसरात धुराचे लोट पसरले होते. विशेष म्हणजे ही इमारत विठ्ठलवाडी ते उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे रूळानजीकच असल्याने लोहमार्गावरही धुराचे लोट पसरल्याने रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिमाण झाला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या तर आगीचे स्वरूप पहाता अंबरनाथ, कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या होत्या. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.