ठाणे - भिवंडीतील राहनाळ गावातील एका केमीकलच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीची घटना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील दौलत कम्पाउंड परिसरात घडली. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे गोदाम बंद असल्याने या ठिकणी कामगार हजर नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या भीषण आगीत गोदामात साठवेला केमिकल साठा जळून खाक झाले आहे.
भिवंडीत केमिकलच्या गोडाऊनला आग
लॉकडाऊनमुळे भिवंडीतील सर्वच गोदामांसह हजारो कारखाने बंद आहेत. त्यातच गेल्या महिन्याभरात लहान मोठ्या आगीच्या ६ ते ७ घटना भिवंडी तालुक्यात घडल्या आहेत. त्यातच आज पुन्हा दुपारच्या सुमाराला रहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील दौलत कम्पाउंड परिसरात असलेल्या रासायनिक गोदामाच्या बाहेर असलेल्या केमिकल ड्रमने अचानक पेट घेऊन ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर केमिकल ड्रमने काही क्षणातच आगीचे भीषण रूप धारण करून स्फोस्ट झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमाक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, पाण्याची कमतरता भासत असल्याने या ठिकाणी अनेक पाण्याच्या टँकर मागविण्यात येऊन आगीवर अडीच तासानंतर नियंत्रण मिळवले. सध्या याठिकाणी कुलींगचे काम सुरु असून, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अग्निशामक दलाचे जवान घेत आहे.