भिवंडीत पुन्हा अग्नितांडव.. कपड्यांच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल - भिवंडीत गोदामाला आग
![भिवंडीत पुन्हा अग्नितांडव.. कपड्यांच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल Fire breaks out again in Bhiwandi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9948343-1052-9948343-1608476391608.jpg)
20:27 December 20
भिवंडीत प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील कोमच्या (तागा) व कपडयांच्या गोदामाला भीषण आग
ठाणे -भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील कोमच्या (तागा) व कपडयांच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन जवानाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीच्या सत्राने भिवंडीतील गोदाम पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान भिवंडी अग्निशनच्या दोन गाड्या रस्त्यातच बंद पडल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कल्याण, ठाणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र या भीषण आगीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या डोळयांना व घशाला त्रास होत असल्याचे समोर आले आहे. आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. तर या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे.
यापूर्वीही कपड्याच्या गोदामासह यंत्रमाग कारखान्याला लागल्या होत्या आगी -
भिवंडी शहरात गेल्याच आठ दिवसापूर्वी फातिमा नगर परिसरात असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याच्या मोठ्या गोदामाला आग लागली होती. या गोदामात कपड्यांसह धाग्याचे कोम मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत लाखो रुपयांचा कपडा व धाग्याचे कोम जळून खाक झाले. तर १५ दिवसापूर्वी भिवंडी शहरात अंजूर फाटा येथील चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये एका यंत्रमाग कारखान्यामध्ये भीषण आग लागली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा जळून खाक झाला होता. तर आठ दिवसापूर्वीही भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते.