ठाणे- दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यावरून महात्मा फुले पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रिज दत्त यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या दिवंगत पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याविरोधात गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबित पात्रा यांनी सोमवारी रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवर कोरोना व्हायरसबाबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यातून दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी आणि बदनामी करण्यात आल्याचे सरचिटणीस ब्रिज दत्त यांनी सांगितले.
तसेच आजच्या घडीला संपूर्ण देश कोरोनासारख्या गंभीर संकटातून जात आहे. केंद्र सरकार त्याचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते अशाप्रकारे दिशाभूल करत असल्याचा आरोपही दत्त यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करत असून याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ब्रिज दत्त यांनी यावेळी सांगितले.