ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आवाड यांच्याविरोधात ठाण्यातील हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार आव्हाड यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष जमनादास खूबचंद पुरूरवाणी (वय ५७) यांच्या तक्रारी वरून हिल लाईन पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १५३ए, १५३बी, २९५ए आणि २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय झालं? :उल्हासनगर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर सिंधी समाजाने आक्षेप नोंदवला होता. तसेच ठाण्यातील सिंधी समाजाने कोपरी येथे एकत्र येऊन याचा निषेध नोंदवला. जोपर्यंत समाज माफी मागत नाही तोपर्यंत विविध संवैधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.