ठाणे :महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभर तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. संभाजी भिडे यांनी नुकतेच महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याला काही दिवस उलटत नाही तोच भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबाबत देखील वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.
अटक न झाल्यास सभागृह चालू देणार नाही : या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याआधी भिडे यांच्यावर अमरावती येथे पहिला गुन्हा दाखल झाला होता. यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी देखील केली आहे. बुधवारपर्यंत भिडे यांना अटक न झाल्यास सभागृह चालू देणार नाही, असा इशारा आव्हाडांनी यावेळी दिला. राज्यात भिडे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
सरकारला जनभावनेचा आदर करावाच लागेल : यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरकारला जनभावनेचा आदर करावाच लागेल. ज्यांचे महात्मा गांधींवर प्रेम आहे, ज्यांचे महात्मा फुले यांच्या योगदानावर प्रेम आहे, अशा महिलांनाही आवाहन करतो की, आपापल्या समाजमाध्यमांमधून व्यक्त व्हा, अन्यथा महिलांना पुन्हा त्या काळात जावे लागेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. भिडे हा समाजघातकी किडा असून त्याला वेळीच ठेचा, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गुन्हा अमरावती शहरात वर्ग केला : संभाजी भिडे यांच्या विरोधात सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 153 (अ), 500 आणि 505 (2 ) अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. हा गुन्हा अमरावती शहरात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास अमरावतीचे राजा पेठ पोलीस करणार आहेत.
हे ही वाचा :
- Amaravati Congress Protest : संभाजी भिडेंविरोधात अमरावती काँग्रेस आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
- Chhagan Bhujbal Reaction : भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - छगन भुजबळ
- Sambhaji Bhide : भाजपात हिम्मत असेल तर सरकारी कार्यालयातील महात्मा गांधींचे फोटो....; महिला आमदाराचे थेट आव्हान