ठाणे - रिलायन्सच्या जिओ कंपनीचे अभियंता आणि ठेकेदाराने महापालिकेची परवानगी न घेताच डांबरी रस्ता खोदल्याची घटना घडली. रस्ता खोदल्याने उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्तेचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाने जिओ कंपनीच्या अभियंतासह ठेकेदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भूषण कोकाटे असे गुन्हा दाखल झालेल्या रिलायन्स जिओ कंपनीच्या अभियंत्याचे नाव आहे. तर रहमान शेख असे ठेकेदाराचे नाव आहे. उल्हासनगर पालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्याची दुरुस्ती वेगाने चालू आहे. असे असतानाच सकाळच्या सुमारास कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी येथील झुलेलाल प्रवेशद्वाराजवळ काही मजुर पालिकेचा डांबरी रस्ता खोदत असल्याचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संपर्क साधून सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. पालिका प्रशासनाने रिलायन्स - जिओ कंपनीना रस्ता खोदण्याची परवानगी दिली नसल्याचे उघड झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या रिलायन्स - जिओ प्रशासनाने पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संपर्क साधता रस्ता खोदण्याची परवानगी दाखवली. मात्र, सदरची परवानगी ही अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातील असल्याचे दिसून आले.