महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीतील भूमी वर्ल्डच्या मालकांसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल - आरपीआय बातमी

भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिकावर कोनगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने घटनेच्या तब्बल पाच महिन्यांनंतर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर कोनगाव पोलिसांनी भूमी वर्ल्डच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन वीस दिवस झाले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

कोनगाव पोलीस ठाणे
कोनगाव पोलीस ठाणे

By

Published : Aug 3, 2021, 10:06 PM IST

ठाणे -अनधिकृत बांधकामासह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये सतत चर्चेत असलेल्या भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिकावर कोनगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने घटनेच्या तब्बल पाच महिन्यांनंतर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर कोनगाव पोलिसांनी भूमी वर्ल्डच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश नानजी पटेल, संदीप नानजी पटेल व रंजित बाबरे, असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

पोलिसांनी उलट तक्रादारावरच केला होता गुन्हा दाखल

प्रकाश पटेल व संदीप पटेल हे भिवंडीतील पिंपळास येथे असलेल्या भूमी वर्ल्ड गोदाम संकुलाचे मालक असून रंजित बाबरे हा त्यांचा व्यवस्थापक आहे. २३ जानेवारी रोजी आरपीआय आठवले गटाचे भिवंडी तालुकाध्यक्ष अभय बंडू जाधव हे आपला मित्र जितेंद्र जगन्नाथ जाधव याच्या सोबत पाईप लाईनने माणकोली येथे जात होते. त्यावेळी भूमीवर्ल्डजवळ थांबले असता फोनवर बोलत असताना सुरक्षारक्षकास अभय यांनी बांधकामाचे फोटो काढल्याचा संशय आल्याने तशी माहिती भूमी वर्ल्ड व्यवस्थापनास दिली. त्यांनतर याठिकाणी भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचा व्यवस्थापक रंजित बाबरे, भूमी वर्ल्डचे मालक प्रकाश पटेल व संदीप पटेल यांच्यासह इतर आठ ते दहा जण आले व त्यांनी अभय यांच्या अंगावर धावत जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे अभय जाधव यांच्या सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी त्यावेळी अभय जाधव यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात भूमी वर्ल्डच्या मालक व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली होती. मात्र, कोनगाव पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत उलट अभय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांवर त्यावेळी गंभीर गुन्हा दाखल केला होता.

घटनेच्या पाच महिन्यांनंतर गुन्हा दाखल

कोनगाव पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने अखेर अभय जाधव यांनी ठाणे जिल्हा स्तर न्यायालयात धाव घेतली होती. अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६ (३) नुसार कोनगाव पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. घटनेच्या पाच महिन्यांनंतर १३ जुलैला कोनगाव पोलिसांनी भूमी वर्ल्डचे मालक व व्यवस्थापक, अशा तीन जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होऊन २० झाले तरीही अटक नाहीच

न्यायालयाच्या आदेशाने भूमी वर्ल्ड गोदाम संकुलच्या मालकावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा भिवंडी पश्चिमचे सहायक पोलीस आयुक्त किसन गावित यांनी दिली आहे. तर गुन्हा दाखल होऊन २० दिवस उलटूनही कोनगाव पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नसल्याने तक्रारदार अभय जाधव यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या दुकलीला लोहमार्ग पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे अटक..

ABOUT THE AUTHOR

...view details