ठाणे - एका आदिवासी शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याची जमीन हडप केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योग समूहासह दोघांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आदिवासी गोपाल मंगेश वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गणेशपुरी येथील शंकर दिनकर आणि ग्रासिम इंडिया (अल्ट्राटेक) च्या व्यवस्थापकीय मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ग्रासिम इंडिया (अल्ट्राटेक) हा उद्योग आदित्य बिर्ला समूहाचा भाग आहे.
आदिवासी शेतकरी १२ वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत -
वाडा तालुक्यातील मौजे चिखले – विजयपुर येथील शेतकरी गोपाल मंगेश वाघ हे कातकरी या आदिम जमातीचे असून, १२ वर्षापूर्वी त्यांची ३ एकर जमीन शंकर दिनकर याने त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करून विकत घेतली. शिवाय त्या जमिनीचा मोबदला १० लाख रुपये ठरला असताना, पीडीत शेतकरी गोपाळ वाघ याला आजपर्यंत केवळ दीड लाख रुपये देण्यात आले. यानंतर दिनकर याने त्याची पत्नी निर्मला सुतार हिचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावले आणि ती जागा त्याने परस्पर ग्रासिम इंडिया अल्ट्राट्रेक सिमेंट कंपनीला विकल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. तसेच पीडित गोपाल वाघ हे संबंधित जागेवर गेले असता, त्या जागेचे सपाटीकरण करून त्यावर बांधकाम सुरु असल्याचेही त्याच्या निदर्शंस आले. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला जबरदस्तीने हुसकावून लावल्याचा आरोपही पीडित शेतकऱ्याने आपल्या तक्रारीत केला आहे. याबाबत पीडित शेतकरी गेल्या १२ वर्षांपासून शंकर दिनकर याच्याकडे आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी लढा देत आहे, मात्र शंकर दिनकर याच्याकडून त्याला उडवाउडवी उत्तरे देऊन टाळत असल्याचे गोपाळ वाघ यांनी सांगितले.