ठाणे - एकिकडे देशासह संपूर्ण जगभर कोरोनाच्या प्रदुर्भावापासून वाचण्यासाठी नागरिकांसह शासन प्रयत्नशील आहे. तर, दुसरीकडे उसनवारीच्या पैशांवरून दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडीत गैबीनगर परिसरात घडली असून या राड्याच्या प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी चार हल्लेखोरांविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटू पिला, छोटू पिलाचा भाऊ रफिक, छोटू पिला याचा दुसरा एक भाऊ व सैनिल (सर्व रा. किडवाई नगर, भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर, इम्रान खान व अफसर इरशाद खान असे राड्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
संचारबंदीतही उसनवारीच्या पैशातून दोन गटात राडा; घटना सीसीटीव्हीत कैद - संचारबंदीदरम्यान दोन गटात हाणामारी
ठाण्यातील भिवंडी गैबीनगर परिसरात पैशाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना संचारबंदीदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादिने शांतीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![संचारबंदीतही उसनवारीच्या पैशातून दोन गटात राडा; घटना सीसीटीव्हीत कैद संचारबंदीतही उसनवारीच्या पैशातून दोन गटात राडा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6678664-859-6678664-1586147718120.jpg)
माहितीनुसार अफसर, इम्रान, व इम्रानचा चुलत भाऊ असे तिघे गैबीनगर परिसरातील घरासमोर शनिवारी पहाटेच्या सुमारास उभे होते. यावेळी जखमी इम्रान हा आरोपी छोटू पिला याला दिलेले पन्नास हजार रुपये तो परत देत नसल्याबाबत या तिघांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, याठिकाणी दुचाकीवरून आरोपी छोटू पीला व त्याचा भाऊ रफिक तसेच आणखी एक भाऊ व सैनिल हे चौघे तिथे येऊन धडकले. त्यांनी इम्रान यास ठोशा बुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून इम्रानला सोडविण्यासाठी अफसर खान मध्ये गेला असता छोटू पिला याने त्याच्या हातातील चाकूने अफसरच्या डोक्यावर आणि उजव्या कानावर वार केले. तर, आरोपी छोटू पिला याच्या दुसऱ्या भावाने लाकडी दांडक्याने डोळ्यावर जबर मारहाण केली.
याप्रकरणी अफसर खान याने मारहाण करणारा आरोपी छोटू पिला व त्याच्या भावांसह चारही हल्लेखोरांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर, पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी करत आहेत. दरम्यान, राज्यात संचारबंदी असतांना पहाटेच्या सुमारास आरोपी व फिर्यादीमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून हाणामारी झाली याचा शोध घेत आहेत. तर, उसनवारी व मारहाण प्रकरणात अंमली पदार्थांच्या खरेदी - विक्रीवरून दोन गटात हाणामारी झाल्याची शंकादेखील व्यक्त करण्यात येत आहे.