ठाणे :खासदार संजय राऊत तसेच मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात मनसे-ठाकरे युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच राज्यात विविध ठिकाणी युतीचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत. राज्यातील बंडानंतर उद्धव ठाकरे तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती करावी अशा युतीच्या चर्चा आहेत. यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या युतीबाबात मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. मनसे आमदार राजू पाटील यांनी युती होईल असे मला वाटत नाही, असे म्हटले आहे. मराठी माणसाची इच्छा असली तरी, समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युतीपेक्षा भीती जास्त वाटते असे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना युतीपेक्षा भीती वाटते अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
आम्ही का करावी युती? :राज्यात एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीला दणका देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत फूट पाडली आहे. आता या दुसऱ्या सत्ता संघर्षानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत तसेच मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांनी युतीबाबत पुढे बोलताना सांगितले कि, युती व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. ते अडचणीत असल्यावर आम्ही का युती करावी. राज ठाकरे अडचणीत असताना उद्धव ठाकरेंनी आमचे नगरसेवक फोडल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. आता उद्धव ठाकरेंवर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही आतापर्यंत कोणाशी युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तिक मत असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.