ठाणे - ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या हिंदी चित्रपटाला शोभेल, अशी घटना डोंबिवलीत घडली होती. शहरात एका बाप लेकाच्या जोडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तर माझे बंधू आहेत, अशी थाप मारली. तसेच आमची आयकर विभागातही ओळख असून तुम्हाला आयकर विभागातून पकडलेले सोने कमी किंमतीत मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका सोनाराला 5 लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी या बाप-लेकाला बुधवारी (दि. 9 जून) बंगळूरू शहरात बेड्या ठोकल्या आहेत. मोबाईल लोकेशनच्या आधारे या बाप-लेकाच्या जोडीला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. आज (दि. 10 जून) दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 14 जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. राजन गडकरी आणि आनंद गडकरी, असे पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या बाप–लेकाची नावे आहेत.
असा होता दोघे बाप लेकाचा फसवणुकीचा फंडा
डोंबिवली पश्चिमेला राहणारे अमोल पळसमकर यांची डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात सोन्याची पेढी आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी जोडीने माझे भाऊ नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत. तुम्हाला आयकर विभागातून पकडलेले सोने कमी किंमतीत मिळवून देतो, असे आमिष आरोपी गडकरी बाप-मुलाने दाखवले. त्यांनतर अमोल यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना 5 लाख रुपये दिले. मात्र, बराच कालावधी उलटून गेल्यावरही आरोपीने सोने दिले नाही. अखेर सोनाराने 24 मे, 2012 रोजी आरोपींच्या घरी जाऊन चौकशी केली असता, आरोपी राजन आणि आनंद हे घर सोडून गेल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणूकीबाबत तक्रार केली त्यावरून गुन्हा दाखल झाला. तसेच ओमकार पवार आणि इतर 7 ते 8 तरुण-तरुणींनाही गडकरी बाप-लेकाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे घेऊन आरोपी बाप-लेकाची जोडी फरार झाली होती.