ठाणे - बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार शहापूर तालुक्यात एका पाड्यातील वस्तीत समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचा गर्भपात झाल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरोधात विविध कलमासह अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नवरा-बायकोच्या भांडणात पीडित मुलगी नराधम बापाकडे...
आरोपी नराधम बापाचा 2007 ला विवाह झाला. त्याला पत्नीच्या नातेवाईकांनी आपलेसे करत घर जावई केले. लग्नानंतर दाम्पत्याला दोन मुली झाल्या. काही वर्षे त्यांनी आपला संसार व्यवस्थित केला. त्यानंतर दोन्ही मुली वयाने वाढत असताना जानेवारी, 2021 ला नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर नवऱ्याने बायकोपासून विभक्त होण्याचा निर्णय घेऊन आपल्या 13 वर्षाच्या मुलीला घरी घेऊन गेला आणि 6 वर्षाच्या मुलीला बायकोकडे ठेऊन गेला.
पोटात असहाय वेदना होत असताना पोटातील गर्भ पडला अन्...
पीडित मुलगी जानेवारी, 2021 पासून नराधम बापाकडे होती. वासनांध बापाने पीडित मुलीला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे गेली 7 महिने सुरू असलेल्या या प्रकाराने पीडित मुलगी गर्भवती राहिली. 19 नोव्हेंबर, 2021 रोजी मुलीच्या पोटात असहाय वेदना होत असताना पोटातील गर्भ पडला आणि तो मृत असल्याचे पाहून त्या नराधम बापाने त्याची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेला घेऊन आईने घेतली पोलीस ठाण्यात धाव...
पीडित मुलीच्या पोटातील गर्भ पडला आणि तो मृत असल्याचे पाहून त्या नराधम बापाने त्याची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजताच तिने पीडित मुलीला विश्वासात घेऊन घडलेल्या प्रकारची विचारपूस केली. तिने तिच्यावर नराधाम बापाने 7 महिन्यांमध्ये केलेल्या क्रुरकृत्याचा पाढाच आई पुढे वाचला. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन आईने खर्डी पोलीस दुरक्षेत्र गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देऊन नराधाम बापाविरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलगी आणि आईच्या जबाबानुसार खर्डी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेशकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस अधिकारी रोहिदास केंद्रे करीत आहेत.
हे ही वाचा -Rape on Minor Sibling : अल्पवयीन बहिण-भावावर प्रियकर-प्रेयसीचा वारंवार बलात्कार