महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane News: मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने हायवेवर सुरू केली शेती, आत्मदहनाचा इशारा - Badlapur Road

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने, चक्क रस्त्यावर माती टाकून शेती करण्यास सुरुवात केली आहे. गेली ५० वर्षे मोबदला न मिळाल्याने आता या शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. एकीकडे मोबदला मिळत नाही आणि दुसरीकडे पोलिसांकडून दबाव येत असल्यामुळे या शेतकऱ्याने महामार्गावरच शेती सुरू केली आहे.

Farming On the Road
हायवेवर सुरू केली शेती

By

Published : Jun 26, 2023, 10:16 PM IST

ठाणे :बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील एकेरी मार्ग गेल्या दोन महिन्याभरापासून बंद आहे. तर दुसरा एकेरी मार्ग अरूंद असल्याने या रस्त्यावर दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र ही वाहतूक कोंडी एमआयडीसी आणि बाधित शेतकरीमध्ये रस्त्याच्या भूसंपादनाच्या वादातून होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेली ५० वर्षांपासून जमिनीच्या भूसंपादनाच्या मोबदल्यावरून तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी एकेरी मार्ग बंद केला आहे. मात्र रस्ता बंद करूनही एमआयडीसी प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जमीन कसण्याचा निर्णय घेत चक्क डांबराच्या रस्त्यावर माती टाकून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली.


अधिवेशनात मांडणार प्रश्न : या शेतकऱ्यांवर बंद केलेला एकेरी मार्ग खुला करण्यासाठी एमआयडीसीचे अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच सुमारास घटनास्थळी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड पोहचले. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसून फक्त पैसे हवे असल्याचा आरोप करत, सदरचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचा त्यांनी यावेळी सांगितले.




एमआयडीसीने ५० वर्षांपूर्वी संपादित केली जमीन : अंबरनाथ तालुक्यातील गावातल्या वसार शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे ५० वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादित केली होती. मात्र हे भूसंपादन करताना केवळ एक कागदी चुक झाली. त्यामुळे बाजूची जागा एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता आणि पाईपलाईनची जागाही गेली आणि बाजूची जागाही एमआयडीसीच्या नावावर झाल्यामुळे तिथेही काही करता येत नाही, अशा अडचणीत शेतकरी अडकला आहे.



एक चूक पडली महागात पाच दशकांचा लढा : ही कागदी चूक सुधारण्यासाठी मागील ५० वर्षांपासून लढा देऊनही एमआयडीसी हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वारस्य दाखवत नाही. त्यातच २२ जून रोजी बुधवारी सकाळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी येत हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विरोध केला. त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.



वाहतूक कोंडी झाली नित्याची प्रवाश्यांना नाहक त्रास : शेतकरी आणि एमआयडीसी प्रशासन यांच्यातील वादाचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे. महामार्गावरील एक मार्गिका ही बंद असल्याने दुसऱ्या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे, कल्याण दिशेकडून येणाऱ्या वाहनांना अंबरनाथ, बदलापूर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो. बदलापूर एमआयडीसीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या मार्गावर जड अवजड वाहनांची वर्दळ असते. वसार गावाजवळ अरुंद मार्गावरुन वाहतूक सुरु असून ट्रक, कंटेनरचे ट्रक, टॅंकर अशी मोठी वाहने आल्यास कोंडी होत आहे. 30 मीटरचा रस्ता हा बंद करण्यात आला असून, त्यापुढे नेवाळी नाका मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताना ही मोठी वाहने अडकत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details