ठाणे - कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्या डाळिंबाला बाजारात मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत नवरा-बायकोने एका शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा जादा पैशाचे आमिष दाखवून तब्बल 3 टन 573 किलो डाळींबचा अपहार करून 19 लाख 45 हजार 922 रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात लाखोंच्या डाळिंबचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी नवऱ्यालाअटक केली आहे. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच बायको फरार झाली असून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. अस्लम हुसेन शेख ( वय 40 रा. काळी मशीद, कल्याण )असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर संतोष भोर (वय 43 रा. वडगांव कांदळी, ता. जुन्नर) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नवरा बायकोचा प्रताप.. 33 टन 'डाळिंब'चा अपहार करुन शेतकऱ्याला लावला लाखोंचा चुना - thane latest crime news
शेतकऱ्यांनी आरोपी अस्लमकडे पैशाचा तगादा लावला असता आरोपीने बायकोच्या नावे असलेल्या बँक खात्याचा धनादेश दिला. मात्र, तोही धनादेश बाउन्स झाल्याने अखेर शेतकऱ्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेऊन लाखोंच्या डाळिंबाचा अपहार केल्याप्रकरणी नवरा-बायको विरोधात भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
![नवरा बायकोचा प्रताप.. 33 टन 'डाळिंब'चा अपहार करुन शेतकऱ्याला लावला लाखोंचा चुना farmers cheated by couple for 33 tonnes of pomegranates of lakhs of ruppies in thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8812003-252-8812003-1600174587550.jpg)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील शेतकरी संतोष भोर यांची वडगाव कांदळी गावात डाळिंब पिकवण्याची बाग असून कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढणाऱ्या डाळिंबाला बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी भोर हे कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये डाळिंब विक्रीसाठी जुलै महिन्यात आले होते. त्यावेळी त्यांची ओळख आरोपी अस्लम शेख यांच्याशी होऊन त्याने बाजारभावा पेक्षा 10 रुपये किलोमागे जादा भाव देणार असल्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला डाळींब खरेदी करताना आरोपीने रोख रक्कम देऊन शेतकर्यांचा विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे 25 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान आरोपींनी शेतकरी यांच्याकडून 3 टन 573 किलो डाळिंब खरेदी केला, त्याचा एकूण मोबदला 19 लाख 45 हजार 952 रुपये झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आरोपी असलमकडे पैशाचा तगादा लावला असता आरोपीने बायकोच्या नावे असलेल्या बँक खात्याचा धनादेश दिला. मात्र, तोही धनादेश बाउन्स झाल्याने अखेर शेतकऱ्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेऊन लाखोंच्या डाळींबचा अपहार केल्याप्रकरणी नवरा-बायको विरोधात भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अस्लमला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली. अस्लमच्या बायकोचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.