ठाणे :मार्च महिन्यातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 273 हेक्टरवरील फळपिकांसह 7 हेक्टरवरील बागायती आदी शेतातील, तब्बल 280 हेक्टरवरील फळबागांसह पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अवकाळी पावसात वीज अंगावर कोसळून शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहे.
आंब्यासह फळबागांचे नुकसान :बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यात तर या खालोखाल अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तालुक्यात झाला आहे. मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे 280 हेक्टरवरील आंब्यासह फळबागांचे नुकसान झाल्याची नोंद स्थानिक तहसील प्रशासनकडून घेण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्यात कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील 7.40 हेक्टर बागायतीचे नुकसान झाले आहे. तर जवळपास 49 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यामध्ये कल्याणच्या 1 शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तर अंबरनाथमधील 48 शेतकऱ्यांच्या 7 हेक्टरमधील बागायतीचे नुकसान झाले आहे.
316 शेतकऱ्यांचे नुकसान :जिल्ह्यातील ३३ टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनांकडून सांगण्यात आले. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली 273 हेक्टरचे नुकसान झाले आहे. 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 836 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. भिवंडीच्या 316 शेतकऱ्यांचे सर्वाधिक 117 हेक्टरचे नुकसान नोंद झाले आहे. तर मुरबाडच्या 173 शेतकऱ्यांचे 43.40 हेक्टर, अंबरनाथ तालुक्यातील 157 शेतकऱ्यांचे 53 हेक्टर, शहापूरच्या 189 शेतकऱ्यांचे 53.42 हेकटरवरील नुकसानीची व मीरा भाईंदरच्या 1 शेतकऱ्याचे 3 हेक्टरवरील फळबागाच्या नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे.