ठाणे : या दोन्ही घटना मुरबाड तालुक्यात घडल्या असून, तीन दिवसांपूर्वीच किसळ गावच्या हद्दीत राहणाऱ्या हरेश पारधी या तरुणावर रानडुकराने केलेल्या हल्ल्यात छातीत गंभीर दु़खापत होत, दुर्दैवी मृत्यू झाला. तर या गावालगत असलेल्या साखरे (धारगांव) येथील शेतकरी मारुती दाजी पवार (५५) यांच्यावर रानडुकराने हल्ला करीत अक्षरशः त्यांना फाडून गंभीर जखमी केले असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार :रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मारुती दाजी पवार हे गावालगत असलेल्या आपल्या शेतावर आज सकाळी गेले होते. त्यावेळी शेतातील भाताचे पेंढे ठेवलेल्या खळ्यात लपून बसलेल्या गावठी रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्याच्या पायाचे अंगाचे लचके तोडत, तोंडावर गंभीर जखमा करीत सर्वांगावर चावा घेऊन गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नातेवाईकांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांच्या तोंडावर व शरीरावर डॉक्टरांनी असंख्य टाके टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
तीन अभयारण्यांच्या हद्दीतील 75 गावपाडे :मुरबाड तालुक्यात भीमाशंकर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड या तीन अभयारण्यांच्या हद्दीत ७५ गावपाडे आहेत. या अभयारण्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात, सर्वत्र "जंगलराज" सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या अरण्यात एका बाजूला शासन वनिकरणाच्या नावाखाली त्याच त्याच खड्ड्यात कोट्यवधींची वृक्षलागवड मोहीम राबवत आहे. त्यामुळे या अभयारण्य क्षेत्रात वाढती वृक्षतोड, पाण्याचा तुटवडा, जंगलांचे सपाटीकरणामुळे माळराण झाल्याने व वन्य प्राण्याच्या अस्तीत्वावरच घाला घातला गेल्याचे दिसून येत आहे.