ठाणे - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणे अपेक्षित होते. मात्र, तसे होत नसल्याने हवालदिल झालेल्या मुरबाडमधील एका शेतकऱ्याने अखेर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. रवींद्र देशमुख, असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
ठाण्यात शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या - भातशेतीच्या नुकसानीने शेतकऱ्याची आत्महत्या बातमी
सरकार स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही संतगतीने सुरू आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नेमकी कधी मिळेल? याच प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

हेही वाचा-आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर
३ नोंव्हेबर रोजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुरबाडाचे आमदार किसन कथोरे यांनी शेतीची पाहणी केली होती. भातशेतीच्या बांधावर जाऊन तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यातच मुरबाड तालुक्यातील शेतकरी संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा देऊन लवकरात लवकर पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. अखेर आज मुरबाडमधील दहिगाव येथील शेतकरी रवींद्र देशमुख यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
विशेष म्हणजे भातशेतीच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी. यासाठी मुरबाड तालुक्यातील शेतकरी, अनेक सामाजिक संघटनांची मुरबाड तहसील कार्यालयावर आंदोलने केली होती. मात्र, मुरबाड प्रशसनाकडून विलंब होत असल्याने आज एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे सरकार स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही संतगतीने सुरू आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नेमकी कधी मिळेल? याच प्रतीक्षेत शेतकरी आहेत.